भाई!
- Harshali

- Jun 29, 2020
- 3 min read
Updated: Jul 2, 2020
१२ जून ला पु.ल.देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला जाऊन २० वर्षे झाली. माणूस जातो म्हणजे नक्की काय होतं ओ? तो नजरेआड होतो,त्याचं physical appearance संपतं; पण पु.ल.देशपांडेंसारखे वल्ली मात्र कुठेच जात नाहीत.ते त्यांच्या पुस्तकांमधून,किस्स्यांमधून आपल्याला कायमच भेटत राहतात ,आयुष्यभर साथ करत राहतात.
'पु.ल.देशपांडे' म्हणजेच 'भाई' हे माझे आतापर्यंतचे सगळ्यात लाडके,आवडते लेखक. मराठी आणि महाराष्ट्रीयन असल्याच्या अभिमानात भर पाडण्याचा महत्त्वाचा वाटा 'भाईं'चाच आहे. मुळात माझी आणि त्यांची ओळख मी लहान असतानाच त्यांच्या 'बटाट्याची चाळ ' या पुस्तकातून झाली. या पुस्तकातून ते आमच्या घरी आले आणि मग घरचेच एक सदस्य झाले. मला अगदी बोटाला धरून या पुस्तकांच्या जगात मुळात आणलंच त्यांनी. आजच्या काळात स्वतःला comedian म्हणवणारे 'standup comedy' च्या नावाखाली फक्त शिव्या देऊन वाहवा करून घेतात ना,तेव्हा मला त्यांच्यापेक्षा ,त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणाऱ्यांचीच कीव येते. सगळेच वाईट आहेत असं काही नाहीये,पण खरं सांगू का 'भाईंसारखं' दुसरं कोणी होणं शक्यच नाही. अगदी अभिमानाने सांगावसं वाटतं की, "या माणसाने आम्हाला खळखळून हसायला आणि जगण्याचा निखळ आनंद घ्यायला शिकवलं".
भाईंवर प्रेम करणारे खूप होते आणि आजही खूप आहेत पण त्याचबरोबर त्यांच्यावर टीका करणारे हि तितकेच होते. ते नेहमी म्हणायचे कि भाई जनतेला वास्तविकतेचा आरसा दाखवत नाही. यावर भाई म्हणत कि " हि सगळी लोकं २४ तासांपैकी २१ तास आरसाच बघत असतात मग उरलेले ३ तास तरी त्यांना स्वप्नं बघू देत की" भाई लेखक होते, नट होते, त्यासोबतच दिग्दर्शक,कथाकथनकार, नकलाकार, पेटीवादक, विनोदवीर तसेच संगीत दिग्दर्शक हि होते. MA LLB झालेले भाई खरे पाहता अष्टपैलूच होते.सुनीताबाईंच्या म्हणजे त्यांच्याच पत्नीच्या शब्दात सांगायचं झालं तर 'गळ्यात सूर आणि बोटात लेखणी घेऊनच ते जन्माला आले होते'. पु.लं.ची पेटी ऐकून बालगंधर्व हि खुश झाले होते आणि शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर बक्षिसरुपी दिली होती.त्यांच्या वडिलांना त्यांचा खूप अभिमान होता.अगदी लहानपणीच त्यांचे वाजवण्याचे आणि गाण्याचे गुण बघून त्यांचे वडील म्हणाले देखील होते कि, 'आपल्या घरी गोविंदराव टेंभे जन्माला आलेत.'अगदी साधेपणाने जगणारे पु.लं.च लग्न हि अगदी साधेपणानेच झालं. रत्नागिरीला ,त्यांच्या सासरी रजिस्टर पद्धतीने. दुर्दैवाने एकही अपत्य नसणाऱ्या पु.लं.नी अख्ख्या महाराष्ट्राला हसवण्याचं पालकत्व मात्र लीलया पार पाडलं!
भाईंनी त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या अनेक 'व्यक्ती आणि वल्ली' अगदी हसतखेळत आपल्या आयुष्यात आणल्या आणि त्या मग कायमचाच आपल्या झाल्या. त्यातले 'रावसाहेब' तर माझे अगदी जवळचेच. आधी घरी गर्भश्रीमंती पण आता परिस्थिती बऱ्यापैकी खालावलेले,कानडी मराठीचा लहेजा असणारे आणि प्रत्येक वाक्यात आपल्या उच्च दर्जाच्या शिव्या घालून त्या वाक्यास पूर्णत्व देणारे.एवढे असूनही तितकेच प्रेमळ आणि नाटकावर प्रेम करणारे रावसाहेब मला प्रचंड आवडतात. पु.लं.च गाणं ऐकल्यानंतर त्यांना दाद देताना त्यांच्या अस्सल कानडी लहेज्यामध्ये रावसाहेब म्हणाले," काय दणदणीत गाणं हो xxxx !( xxxx च्या जागी एक दणदणीत शिवी) वा! -पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजवतय कि हो--त्याला एक थोडं चा पाजा चा--- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव कि रे म्हणा कि त्या xxxxxला! इथे एक पाच शब्दांची शिवी छप्पर फाडून गेली"- हे वाचल्यानंतर हसला नसेल असा मनुष्य सापडणं अशक्यंच! 'चितळे मास्तरां'बद्दल वाचल्यावर तर मी माझ्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांमध्ये मी 'मास्तर' शोधण्याचा प्रयत्न करायचे. चितळे मास्तरांचा वाहन विसरण्याचा स्वभाव जगप्रसिद्ध! चितळे मास्तर म्हटलं कि सगळ्यात आधी मला त्यांचं चपला विसरणंच आठवतं . वर्गात वहाणा विसरून जाणं हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम होता.मग विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी त्या पुढच्या वर्गात पोहचवायच्या. "अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या! तुम्हाला तासभर देखील नाहो का रे जमत ?" -असे म्हणत. त्याचप्रमाणे रत्नागिरीला स्वतःच्याच लग्नासाठी गेल्यावर पु.लं.ला 'अंतू बर्वा' भेटले. जावईबापू अशी हाक देऊन त्यांनी त्यांना जवळ बोलावले आणि चहा मागवला. मुळातच साऱ्या आळीचेच बोलणे तिरके असल्याने चहा वाल्या पोराला चहामध्ये दूध कमी का? असा साधा प्रश्न न विचारता " रत्नागिरीच्या साऱ्या म्हयशी तूर्तास गाभण का रे झंप्या ?' असे बोलणारे अंतूशेट मनात घर केल्याशिवाय राहत नाही. त्या सोबतच प्राज्ञ मराठी बोलणारा 'सखाराम गटणे' जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी केव्हा येऊ विचारताना म्हणतो,"निश्चित वार सांगू शकाल का आपण?नाही सांगितला तरी चालेल मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलंच आहे." आणि यावर पु.लं.नी घेतलेली त्याची फिरकी -हे लहानपणी वाचलेलं अजूनही माझ्या लक्षात आहे. नाथा कामतच " बाबा रे! तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं" असो किंवा शंकऱ्याचं "हनिमून म्हणजे काय ओ फादर ?" असं निरागसपणे स्वतःच्या बापाला विचारणं असो -तुम्हाला खळखळून हसवल्याशिवाय राहत नाही. भाई, आज तुमच्या निरागस, निष्पाप विनोदांची खरंच गरज आहे हो! खरं सांगू का,जरी तुम्ही आता आमच्या सोबत नसलात तरी,आज हि कधी कधी तुम्ही लिहलेले वल्ली आसपास दिसतात,तेव्हा ते तुमची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. मग मी मात्र अगदी मनमुराद हसते! या अशा मनमुराद,खास ठेव्यासाठी खरोखर खूप खूप धन्यवाद!
इथे परदेशात असल्यामुळे पु.लं.ची आणि एकूणच मराठी पुस्तक मिळणं कठीण होतंय,पण बदलणाऱ्या जगाचा काहीतरी फायदा या kindle रुपी पर्यायाने बऱ्याच अंशी सुटतोय. हा आता पुस्तकांचा सुगंध सोडला तर बाकी पुस्तकांचा फील आणून देण्यात जेफ बाबा यशस्वी झालेत,हे मात्र खरं ! तुम्हा मित्रांसाठी मी kindle आणि भाईंच्या मला आवडलेल्या एका पुस्तकाची लिंक खाली देते. तुम्हाला जर मी अशीच पुस्तकांची ओळख किंवा अगदी specifically सांगायचं तर book review लिहावे असं वाटतं असेल तर तसं मला नक्की कळवा.त्यासोबतच हा वरील लेख हि तुम्हाला कसा वाटला ते हि नक्की सांगा!
1.Kindle Paperwhite:
2.Asa mi Asami

Sundar lekh ,Pulansarkhya Sunitabainche likhan awadke.. Aahe Manohar tari madhe pu la navyane sapadtat . Tyanchi itar anubhavchitre jamlyas vacha.
Bahut acchi post hai bhai ke upar 👍
अगदी खरं.... भाई ते भाईच!!!