पत्रास कारण की..!
- Harshali

- Jan 6, 2021
- 2 min read
प्रिय...,
पत्र लिहायला तसा थोडा उशीरच झाला बघ. काय करणार ह्या कोरोनाने सगळीकडेच लॉकडाऊन लावलंय रे म्हणून इतका उशीर. तुला वेगळं आणि काय सांगू तू येता येता बघत, ऐकत आला असशीलच. खोटं नाही सांगत हि सगळी त्याचीच करणी रे. तो असतानाच आला न हा कोरोना. उगाच नाही लोकं बोल लावत त्याला अजूनही, अगदी गेल्यानंतरही! कर्म म्हणायचं आणि काय? अरे मी तर असं पण ऐकलंय कि संगनमताने केलंय त्यांनी हे, कोरोना आणि त्याने! पण मी फक्त ऐकलंय हा नाहीतर म्हणशिल तुझ्याच नातेवाइकांबद्दल असं तुझ्याचसमोर वेडंवाकडं बोलतेय म्हणून.
उगाच तोंड कशाला बारीक करतोस? माझा काही वैयक्तिक राग नाही हो, त्याच्यावर पण त्याला किनई त्याच वागणं भोवलं असणार. म्हणजे तो असतानाच दुकानं काय बंद झालीत, सगळे व्यवहार ठप्प झाले. एका देशातून दुसऱ्या देशातच काय पण साधं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं महाग झालं रे. चालत गेली रे माणसं त्यात प्रवासात काही वाचली तर काही कायमची प्रवासाला निघून गेली. राव असो वा रंक या आजारापायी आपल्या माणसांना साधं बघणं हि त्यांच्या नशिबातुन काढलं रे. हे सगळं कोणाच्या काळात झालं तर ह्याच्या.

हा आता चूक काय ह्याचीच झाली असं नाही थोडं आमचं हि चुकलंच बरं का. म्हणजे सरकार ओरडून ओरडून सांगत होतं कि आहेत तिथेच रहा आम्ही घेऊ काळजी, पण ऐकायचं नाही असं ठरवूनच आम्ही वागत होतो पण आता करतोय न आम्ही मान्य ते. या काळात जशी ताटातूट आम्ही सहन केली तशीच घरात एकमेकांना या आधी दिला नसेल तितका वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवला. घरातली अगदी सगळी कामं करण्यापासून ते नवनवीन कामं शिकून घेऊन ते स्वतः करण्यापर्यंत आम्ही सगळं म्हणजे सगळं केलं. छंदांना वेळ द्यायला शिकलो. याच्याच काळात आम्हाला पुन्हा एकदा आमच्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर, पोलीस, शिक्षक,सफाई कर्मचारी आणि असे अनेक जण यांची महती नव्याने कळली. तेव्हा सगळंच काही याने वाईट नाही दिलं. उलट एक चौकट मोडून नव्याने जगायला शिकवलं. तेव्हा फक्त राग न करता आभार हि मानायला हवे होते, ते राहिलंच बरं का. तुला जर जमलं तर आमच्याकडून हि 'थँक यू' नोट देशील का २०२० ला?

तुझ्या येण्याने केवढा दिलासा मिळालाय म्हणून सांगू. सगळं काही पूर्ववत होईल असं वाटतंय. जे काही चांगले बदल झालेत ते सगळे घेऊन, वाईट गोष्टी विसरून जाऊन नव्याने सुरुवात करूया म्हणतेय. हां, पण तू अजिबात परफॉर्मन्स प्रेशर घेऊन नकोस बरं. आम्ही आहोत तुझ्या सोबत. तू हि खूप गोष्टी आम्हाला शिकवशील आणि आनंदाने जगण्याची अजून एक संधी आम्हा सगळ्यांना देशील याची खात्री आहे. अरे हो, या सगळ्या लेखन प्रपंचात तुझं स्वागत करायचं तर राहिलंच ना.

"Welcome २०२१"




Khup khup chaan..